Samavartanam Rite, Samavartanam Sanskar, Just waiting to enter in Grihasthashram,

समावर्तन

'समावर्तन' (सम् + आ +  वृत्) म्हणजेच विद्यार्जन संपवून स्वगृही परत येणे.  म्हणजेच ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती होय.  पूर्वीच्या काळी वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर गुरुगृहीच, घरी  परतण्याच्या आधी  संस्कार केला जात असे.  यामधे कंबरेतील करगोटा काढून टाकतात म्हणून याला 'सोडमुंज' असेही संबोधले जाते.

समावर्तनानंतर विवाहापर्यंतच्या कालावधीत मुलाची गणना 'स्नातक' म्हणून केली जाते .  तसेच स्नाताकाने ब्रह्मचर्याश्रम व पुढे विवाह झाल्यानंतर प्राप्त होणारा गृहस्थाश्रम  या दोन्ही आश्रमांतील आवश्यक नियमांचे पालन करणे त्याच्याकडून अभिप्रेत आहे .  विवाह हा जसा नेमक्या कोणत्या वर्षी करावा याचा शास्त्रात स्पष्ट उल्लेख नाही त्याप्रमाणेच 'समावर्तन' कधी करावे याचाही उल्लेख नाही.  तथापि सर्वसाधारणपणे उपनयनानंतर १२ वर्षांनी (म्हणजेच २० वर्षाच्या आसपास) सुमुहूर्तावर करण्यास हरकत नसावी.

या संस्कारात खालीलप्रमाणे विधी असतात.

१) मुहूर्ताच्या दिवशी आन्हिक आटोपल्यानंतर सकाळी पुण्याहवाचन करुन स्नातकाने स्वत: प्रधानहोम करावा.  त्यानंतर न्हाव्याकडून डोक्यावरील शेंडी वगळता, सर्व केस काढून परत स्नान करावे.

२) स्नानानंतर आचमन विधी करुन उपनयनाच्या वेळी  घातलेल्या खांद्यावरील एका यज्ञोपवीतात समंत्रक आणखी एकाची भर टाकावी.  म्हणजेच आणखी एक यज्ञोपवीत घालावे.  त्यानंतर २ नवीन वस्त्रे अंगावर धारण करावीत. 

३) उपरोक्त मंत्रानुसार स्नातकाने आपल्या डोळ्यांमधे काजळ घालावे व कानांमधे कुंडले घालावीत.  त्यानंतर सर्वांगास सुवासिक अत्तराचे लेपन करावे.  स्वत:च्या कपाळी मुंडावळ बांधावी.  गळ्यात किमान एखादा सोन्याचा मणी असलेला हार, हातात छत्री व दंड, डोक्यावर पागोटे व पायात चपला घालाव्यात.  त्यानंतर देवळात देवदर्शन करुन परत घरी यावे.

४) देवळातून परत आल्यावर हात-पाय धुवून आचमन करावे, समंत्रक, होमामधे सामिधांचे हवन करावे व त्यानंतर होमकार्य पूर्ण करावे.

समावर्तन संस्कार झाल्यानंतर विवाह होण्यापूर्वी, उपनयनानंतरच्या वेळेपासून सांप्रत काळापर्यंत, घराण्यातील जवळच्या निवर्तलेल्या व्यक्तींसाठी, प्रातिनिधिक स्वरूपाचे अशौच तीन रात्री पाळावे.

संपर्क करा